anna ashtekar 99

१००- अण्णा अष्टेकर पुर्णतः काल्पनिक ® at fwa 81021022 © मकरंद बेहेरे…….

……. ओगल्यांची सुमन, महादेव निवासमधला आणखी एक अॅंटीक पिस होता, घराण्यांतर्गत चालत आलेला आचरटपणाचा कळस, शिरोमणी, मुळात ओगल्यांच्या घराला त्यांच्या एकंदर किळसवाण्या आचरणामुळे वाळीत टाकलं होतं, सगळ्या चाळीने, जेवढे सगळे जीवंत ऐवज होते, ते सगळे काळे कभिन्न, कुणाकुणाला चाळीने टोपण नावं दिली होती, त्यांच्या घरातल्या कर्त्या बाईला हेमा मालिनी, तिच्या मुलाला म्हणजे सुमनच्या भावाला जो काण्या होता त्याला अमिताभ बच्चन, तर सुमनला कमळा बकुळा, सुरूपच्या बहीणीच सुश्राव्याच जरी ती सुमनपेक्षा खूप लहान असली तरी तीला अकाली प्रौढत्व आलं होतं त्यामुळे सुमनचं आणि तीचं चांगलं मेतकूट जमायचं, दोघी एका माळेच्या मणी, थोडक्यात, सर्वार्थाने “सुमारिका!”

…….तर तो काळ होता ८० च्या दशकाचा नुकतंच महादेव निवासमध्ये पहिलं वाहिलं लव्ह मॅरेज पुर्णतः यशस्वी झालं होतं, आणि चाळीतल्या बालभारती ते, कुमारभारती, युवकभारती वाचणार्यांसाठी ते आदर्श ठरलं होतं, बरं मुलगी आमच्या चाळीतली होती आणि, सुमनचा टोकाचा विपर्यास होती, बोल्ड अॅंड ब्युटीफुल. त्यामुळे समकालीन शिंग फुटलेल्या आमच्या पंचक्रोशीतल्या मुला मुलींना एक आदर्श उत्तरपत्रिका ठरली होती जी वाचून प्रत्येक जण प्रेमाचा अभ्यासक्रम सुरू करून त्यात उत्तीर्ण व्हायचा प्रयत्न करत होता काही, यशस्वी ठरत होते तर काही अयशस्वी……. सुमनने तर डायरेक्ट डाॅक्टरीच केली…….

……. शाळेपासूनच अभ्यासात लक्ष नसलेली, तीला बर्याच वाममार्गी कलांमध्ये गती होती. त्यामुळे शाळेतून घरी बसवलेली, पी. एच. डी चा पेपर काॅपी करून नापास झाली. एकतर्फी प्रेम, तो चाळीतला चांगल्या अर्थाने, खर्या अर्थाने “आॅल राऊंडर”, जो कधी तीला वार्याला उभी करत नसे ही त्याच्यावर लाईन मारायची, त्याच्या मागे लागली, त्याच्याशी लगट करायच्या या ना त्या कारणाने संधी शोधायची, पण तो तीला चारा घालायचा नाही, प्रकरण वाढत गेलं, आणि एके दिवशी भावना अनावर होऊन, तीने चाळीत लग्नासाठी तमाशा केला, त्याला आत्महत्येची धमकी दिली, त्याने भर चाळीत तीच्या कानाखाली खणकन वाजवली, प्रकरण दोघांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचलं, त्याच्या आई-वडिलांना त्याच्यावर विश्वास होता की तो काही वावगं करणार नाही, “निकाल” लागला. तेव्हा तिच्या आई वडीलांनी तीला काय ते विचारलं, ती म्हणाली “हो, तो माझा मानलेला नवरा आहे!”

anna ashtekar 96

96- अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa 71022162, © मकरंद बेहेरे…….
…….सुश्राव्याला मी अण्णा आणि तिचा भाऊ कितीतरी वेळा सांगायचो, तुला जे काही सांगायचं असेल बोलायचं असेल ते जमीनीच्या कानात हळू आवाजात सांगत जा, पण नाही…….ती “सगळे बोय्ये पण मी नाही बोय्यी!” या गटातील होती…….
…….जीवनात, आयुष्यात पहिल्यांदाच येणार्या, मिळणार्या गोष्टीचं अपृप सगळ्यांनाच असतं, पहिलं प्रेम, नविन खाल्लेल्या पहिल्याच पदार्थांची जीभेवर आयुष्यभर रेंगाळणारी चव, घेतलेली स्वत:ची मालकी हक्काची जागा, पहिली गाडी, पहिला घेतलेला दूरदर्शन संच इ. तसं अपृप होतं सुरूपला फुकटात बघायला मिळत असलेल्या केबल टी.व्हीच, होय ही गोष्ट आहे १९९०च्या आसपासची, मुंबईमध्ये केबल टिव्ही नुकताच सुरू झाला होता तेव्हाची, सुरूप सुश्राव्याचा भाऊ, त्याच्या पोटात बर्याच गोष्टी दबून राहायच्या…….पण सुश्राव्या एकदम विरुद्ध बाजूच टोक, राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या सिंह राशीच्या वर्णनाशी बरोब्बर मिळती जुळती, सगळीकडे “मी” पणा घ्यायला पुढे असायची, त्यामुळे तिच्यामुळे सुरूप बरेच ठिकाणी माती खायचा, तोंडघाशी पडायचा……
सुश्राव्याच्या तोंडात जरा सुध्दा तीळ भिजत नसे…….
…….सुरूप आणि सुश्राव्या दोघेही चाळीत एकटेच राहायचे, आई वडील लागोपाठ, काही वर्षाच्या फरकाने वारलेले त्यामुळे, आई-वडीलांनी मृत्यू पश्चात तुटपुंजी ठेवली होती ती व्याजी लावून जगत होते, इतर नातेवाईक येऊन जाऊन लक्ष ठेवायचे, पण त्यामुळे सुरूपला चैन परवडत नव्हती आणि त्यातून दोघेही महाविद्यालयात शिकत होते, दोघांच अर्ध शिक्षण होणं बाकी होत, त्यामुळे असलेला पैसा जपून वापरणं गरजेचं होतं, सुरूप छोटी मोठी नोकरी बघत होता पण मिळत नव्हती…….
…….सुरूप अण्णाच्यामध्ये एक बिर्हाड सोडून राहात होता, आणि ते बिर्हाड होतं ‘आॅल आऊट फाॅर नो लाॅस’ वाल्या टवाळाचं, सुरूपचा स्वभाव अण्णासारखाच असल्याने, त्याचं सगळ्यांशी जमत होतं, पण त्या टवाळाचं कुटुंब म्हणजे, घाणीतून पैसा वेचणारं, फुकट ते पौष्टीक या प्रवृत्तीचं, फक्त पैसा पैसा आणि पैसा, बर्याच गोष्टी अशा होत्या त्या नाईलाजाने विकत घेऊन जगत होतं, आणि ते बोलण्यातून सतत काढून दाखवत……. अण्णाच्या कुटुंबाला जसा त्यांचा त्रास होता तसा सुरूपलाही होता…….
…….तर त्यावेळी केबल टि.व्ही नुकताच आलेला, दूरदर्शनचा एक चॅनल आणि केबलचा एक चॅनल असे दोनच चॅनल दिसायचे, सगळ्या चाळीत एकच केबल नेटवर्क होतं त्यामुळे सगळ्या चाळीत एकच आवाज घुमायचा, आता चाळीला दुसरा पर्याय मिळाला होता, नविन आलेल्या चित्रपटांपासून विचित्रपटांपर्यंत सगळी रेलचेल होती, सुरूपला चैन परवडणारी नव्हती म्हणून सगळ्या चाळीत फक्त तोच एक होता ज्याने केबल घेतलं नव्हतं, पण त्याच्या घरी कलर टीव्ही होता आणि स्वत:च डोकं, त्याने कलर टीव्हीचा इनडोअर अॅंटेना आणला, आणि तो घरातल्या घरात असा लावला, की बाहेरच्या बाजूने जाणार्या केबलच्यामध्ये फक्त घराची भींत, ना वायरमध्ये सुई खुपसण्याचा प्राॅब्लेम, ना घराच्या बाहेर अॅल्युमिनिअमच्या थाळीचा अॅंटेना लावायचा, आणि त्याच्या घरी केबल इतकं क्लिअर दिसायचं, की नेटवर्क आॅफिशिअल घेतलेल्याच्या घरी पण दिसत नसेल, त्यातून आवाज वाढवावा लागत नसल्याने कोणाला कळण्याचा प्रश्र्नच उद्भवत नव्हता, ही गोष्ट फक्त मला आणि अण्णालाच माहित होती, पण हे सुरूपने कुणाला बरेच दिवस कळू दिलं नव्हतं…….
…… त्यावेळी खलनायक हा चित्रपट बराच हाईप झाला होता, ज्या आठवड्यात तो लागला त्याच आठवड्यात तो केबलवर आम्ही बघितला अगदी नव्वदीला सगळे अवयव ठणठणीत असलेल्या म्हातार्यांनीही जागून पाहिला…….
…….दुसर्या दिवशी चाळीत खलनायकवर गप्पांचे ठिकठिकाणी फड रंगले, चर्वीचरण सुरू झालं, टवाळाची ओसरीही त्याला अपवाद नव्हती…….
……आणि मध्येच पडवीत रेंगाळत, चर्चा चोमडेपणाने ऐकणारी सुश्राव्या तिला कोणीही विचारलं नसताना टपकली……” बरं झालं ते चोली के पिछे क्या है रिवाइंड करून दाखवलं, मज्जा आली!” सुरूपने कपाळावर हात मारून घेतला, त्या टवाळाचा आणि कुटुंबाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता कारण त्यांनाही कोणीतरी शेरास सव्वाशेर भेटला होता…….
…….सगळ्या चाळीला माहित होतं सुरूपकडे केबल नाहिये ते!

anna ashtekar 101

अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक) ® at fwa 81021062, © मकरंद बेहेरे…….
…….आज अण्णाला बर्याच जणांनी फेसबुक वरून मित्रयादीतून काढून टाकलं तर व्हाॅट्स अॅपवर बर्याच गृपमधनं रिमुव्ह केलं गेलं कारण अण्णाचा स्पष्टवक्ता स्वभाव…….सीधी बात नो बकवास…….
……. आजकाल थोबाडपुस्तकामुळे आणि काय अप्पामुळे उठसूट काही ना काही संदेश देण्याचं प्रमाण अनाकलनीय वाढलेलं आहे, म्हणजे अगदी एखाद्या मेलेल्या व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबीयांना “आपल्या घरातल्या अमुक अमुकच्या मर्तिकाच्या हार्दिक शुभेच्छा”, किंवा “हे मेलेल्या माणसा तुला आलेल्या तुझ्या मृत्यूचे हार्दिक अभिनंदन!”…….हे असे संदेश येणं बाकी आहे, अतिशयोक्ती आहे, पण काही कालांतराने हे ही घडू शकतं, काही सांगता येत नाही. बरं त्या शुभेच्छा किंवा ते संदेश देणारे, मनापासून देत असतात का पैसे पडत नाहीत म्हणून देखल्या देवा दंडवत! एकतर या अभासी साधनांमुळे जग जवळ येत चाललयं पण प्रत्यक्षात माणसांच्या नात्यांमधला ओलावा कमी होत चालला आहे, आणि दुरावा वाढत चालला आहे प्रत्यक्ष भेटी गाठी बंद होत चाललेल्या आहेत, हे असे विविध विशेष दिवस आणि त्याबद्दलच्या संदेशांना उद्देशून “शिळ्या कढीला ऊत” किंवा “मेलेल्या मुंगीला शेरभर दुध” या सारख्या म्हणी समर्पक वाटतात…….
…….आज प्रजासत्ताक दिन आज प्रत्येकाचं देशप्रेम ओसंडून वाहत होतं या ना त्या स्वरूपाने, प्रत्येकजण एकमेकांना भरभरून शुभेच्छा देत होता. काहीजणं आपली तोकडी प्रतिभाही त्यात दाखवत होते त्यामुळे अभासी माध्यमेही ओथंबून वाहत होती, जी या अशा विविध विशेष दिनांसाठी आणि संदेशांसाठी प्रसिध्द आहेत, त्यात काही हौशे नवशे आणि गवशेसुध्दा होते, तर काही दुसर्याच्या नथीतून तीर मारणारे आणि बर्याच प्रवृत्ती, आज फक्त फळाचं बाहेरचं कवच आवरणं उरलेलं आहे आतला गर कधीच सुकून गेला आहे, कारण अथक प्रयत्नानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याच प्रत्येकाला खरच किती आज मोल आहे हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे मग ती समाजातली कोणत्याही स्तरातली व्यक्ती असो, आज प्रत्येकानं आपलं आत्मपरिक्षण करावं की आज आपण देशासाठी तेवढेच सचोटीने, नितिमत्तेने योगदान देतो आहोत?. की असे दिवस फक्त तोंडदेखल्या झेंडावंदनासाठी आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उरलेले आहेत की अप्पलपोटी स्वार्थासाठी?
……. तर आज अण्णाच्या भिंतीही इतरांनी दिलेल्या शुभेच्छांनी सजल्या होत्या. आणि वरील जे काही बौध्दिक आहे ते अण्णाच्या उद्विग्नतेतून बाहेर पडलेलं जे त्याने मला फोनवर ऐकवलं आणि त्याचा परिपोष असा झाला की अण्णाला आलेल्या प्रत्येक संदेशाला त्याने वैयक्तिक उत्तर असं दिलं “ज्या दिवशी तुमचे प्रत्येकाचे मृतदेह सन्मानाने सीमेवरील सैनिकांच्या पार्थिवासारखे तिरंग्यात वेढलेले दिसतील, त्याच दिवशी तुमच्या देशभक्तीपर शुभेच्छा खर्या मानल्या जातील “…….शेवटी अण्णाच तो…….

anna ashtekar 97

97- अण्णा अष्टेकर पुर्णतः काल्पनिक ® at fwa 71021050, © मकरंद बेहेरे…….
……. आधीच केस विस्कटलेले, त्यात अर्धे दात पडलेले, आणि त्यात अजय सातारकरनी तिची स्वत:ची केलेली मिमिक्री पाहून, सुळ्यांच्या म्हातारीने बत्तीशी विचकटली, मेली अशी हडळीसारखी दिसत होती तिचं ते रूप पाहून सगळ्या चाळीच्या मनात चर्र झालं…….
…….अजय सातारकर एक रिकामटेकडा, भरपूर कलागुण अंगात असलेला, तोच तो ज्याने गीत महाभारत लिहायचा प्रयत्न केला होता, आणि चाळीच्या नवरात्रोत्सवातला मिमिक्री किंग, त्याच्या ग्रहांच दान वेगळच पडलं होतं म्हणून वाया गेला, इतकं की हल्ली कानावर बातमी आली की ज्योतिष सांगू लागला होता आणि आकाशातले ग्रह तारे लोकांना अंगठीत घालायला द्यायचा आणि अवाच्या सव्वा किमतीत बिनधास्त विकायचा आणि ते खोटे निघायचे म्हणून नंतर लोकं त्याला चोप द्यायला लागली, फसवणुकीची पोलिस केस होणं बाकी राहिलं होतं…….
…….तर या अजय सातारकरला त्याच्या ऐन रिकामटेकड्या उमेदीच्या अवस्थेत टाईमपास करायला गिर्हाईक लागायचं, आणि तो आला की त्याच्यावर सगळी चाळ आपला टाईमपास करून घ्यायची, आणि तो ही जाणिवपूर्वक स्वत:चा वापर होऊ द्यायचा, आणि त्यात अण्णाचे विरोधक गिर्हाईक असतील तर अण्णाची ही त्याला फुस असायची…….
…….तर आजचं गिर्हाईक होती सुळ्यांची म्हातारी, मग काय अण्णालाही चेव चढला, तिच्या बद्दल आधीच सांगून झालंय म्हणून परत तेच पालुपद लावत नाही. तर आजच्या आयटमचा विषय होता अंगात येणे, सातारकरचा खेळ सुरू झाल्याबरोबर एक एक प्रेक्षक जमू लागलं आणि सातारकरच्या अंगात येऊ लागलं, तो जे काही करत होता ते पाहून कुणी गालातल्या गालात कुणी, खुदकन, कुणी चेहर्यावर काहीही भाव न दाखवता आसूरी आनंद घेत होता कारण तो जे काही करत होता ते सगळ्या चाळीला पटत होतं, मधेच काहीजणं त्याला प्रश्न करत होते, उपाय मागत होते, नमस्कार करत होते पण तो जे काही करत होता तो वेडाचार वाटत होता, म्हणून अण्णालाही ते सहन झालं नाही म्हणून अण्णाने त्याला एक सणसणीत कानाखाली वाजवली, आणि ओरडला “अरे अजय असं वेड्यासारखं काय करतोयस तू?” त्यावर अजयने भानावर आल्याचं नाटक केलं म्हणाला “अरे काही नाही सुळे वहीनी माझ्या अंगात आल्या होत्या……!” हे ऐकुन तिथे जमलेल्यांचा अण्णासकट एकच हशा पिकला……. आणि हे सगळं सुळ्यांच्या पडवीत, सुळयांच्या म्हातारीसमोर चालू होतं…….

anna ashtekar 96

96- अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa 71022162, © मकरंद बेहेरे…….
…….सुश्राव्याला मी अण्णा आणि तिचा भाऊ कितीतरी वेळा सांगायचो, तुला जे काही सांगायचं असेल बोलायचं असेल ते जमीनीच्या कानात हळू आवाजात सांगत जा, पण नाही…….ती “सगळे बोय्ये पण मी नाही बोय्यी!” या गटातील होती…….
…….जीवनात, आयुष्यात पहिल्यांदाच येणार्या, मिळणार्या गोष्टीचं अपृप सगळ्यांनाच असतं, पहिलं प्रेम, नविन खाल्लेल्या पहिल्याच पदार्थांची जीभेवर आयुष्यभर रेंगाळणारी चव, घेतलेली स्वत:ची मालकी हक्काची जागा, पहिली गाडी, पहिला घेतलेला दूरदर्शन संच इ. तसं अपृप होतं सुरूपला फुकटात बघायला मिळत असलेल्या केबल टी.व्हीच, होय ही गोष्ट आहे १९९०च्या आसपासची, मुंबईमध्ये केबल टिव्ही नुकताच सुरू झाला होता तेव्हाची, सुरूप सुश्राव्याचा भाऊ, त्याच्या पोटात बर्याच गोष्टी दबून राहायच्या…….पण सुश्राव्या एकदम विरुद्ध बाजूच टोक, राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या सिंह राशीच्या वर्णनाशी बरोब्बर मिळती जुळती, सगळीकडे “मी” पणा घ्यायला पुढे असायची, त्यामुळे तिच्यामुळे सुरूप बरेच ठिकाणी माती खायचा, तोंडघाशी पडायचा……
सुश्राव्याच्या तोंडात जरा सुध्दा तीळ भिजत नसे…….
…….सुरूप आणि सुश्राव्या दोघेही चाळीत एकटेच राहायचे, आई वडील लागोपाठ, काही वर्षाच्या फरकाने वारलेले त्यामुळे, आई-वडीलांनी मृत्यू पश्चात तुटपुंजी ठेवली होती ती व्याजी लावून जगत होते, इतर नातेवाईक येऊन जाऊन लक्ष ठेवायचे, पण त्यामुळे सुरूपला चैन परवडत नव्हती आणि त्यातून दोघेही महाविद्यालयात शिकत होते, दोघांच अर्ध शिक्षण होणं बाकी होत, त्यामुळे असलेला पैसा जपून वापरणं गरजेचं होतं, सुरूप छोटी मोठी नोकरी बघत होता पण मिळत नव्हती…….
…….सुरूप अण्णाच्यामध्ये एक बिर्हाड सोडून राहात होता, आणि ते बिर्हाड होतं ‘आॅल आऊट फाॅर नो लाॅस’ वाल्या टवाळाचं, सुरूपचा स्वभाव अण्णासारखाच असल्याने, त्याचं सगळ्यांशी जमत होतं, पण त्या टवाळाचं कुटुंब म्हणजे, घाणीतून पैसा वेचणारं, फुकट ते पौष्टीक या प्रवृत्तीचं, फक्त पैसा पैसा आणि पैसा, बर्याच गोष्टी अशा होत्या त्या नाईलाजाने विकत घेऊन जगत होतं, आणि ते बोलण्यातून सतत काढून दाखवत……. अण्णाच्या कुटुंबाला जसा त्यांचा त्रास होता तसा सुरूपलाही होता…….
…….तर त्यावेळी केबल टि.व्ही नुकताच आलेला, दूरदर्शनचा एक चॅनल आणि केबलचा एक चॅनल असे दोनच चॅनल दिसायचे, सगळ्या चाळीत एकच केबल नेटवर्क होतं त्यामुळे सगळ्या चाळीत एकच आवाज घुमायचा, आता चाळीला दुसरा पर्याय मिळाला होता, नविन आलेल्या चित्रपटांपासून विचित्रपटांपर्यंत सगळी रेलचेल होती, सुरूपला चैन परवडणारी नव्हती म्हणून सगळ्या चाळीत फक्त तोच एक होता ज्याने केबल घेतलं नव्हतं, पण त्याच्या घरी कलर टीव्ही होता आणि स्वत:च डोकं, त्याने कलर टीव्हीची अॅंटेना आणला, आणि तो घरातल्या घरात असा लावला, की बाहेरच्या बाजूने जाणार्या केबलच्यामध्ये फक्त घराची भींत, ना वायरमध्ये सुई खुपसण्याचा प्राॅब्लेम, ना घराच्या बाहेर अॅल्युमिनिअमच्या थाळीचा अॅंटेना लावायचा, आणि त्याच्या घरी केबल इतकं क्लिअर दिसायचं, की नेटवर्क आॅफिशिअल घेतलेल्याच्या घरी पण दिसत नसेल, त्यातून आवाज वाढवावा लागत नसल्याने कोणाला कळण्याचा प्रश्र्नच उद्भवत नव्हता, ही गोष्ट फक्त मला आणि अण्णालाच माहित होती, पण हे सुरूपने कुणाला बरेच दिवस कळू दिलं नव्हती…….
…… त्यावेळी खलनायक हा चित्रपट बराच हाईप झाला होता, ज्या आठवड्यात तो लागला त्याच आठवड्यात तो केबलवर आम्ही बघितला अगदी नव्वदीला सगळे अवयव ठणठणीत असलेल्या म्हातार्यांनीही जागून पाहिला…….
…….दुसर्या दिवशी चाळीत खलनायकवर गप्पांचे ठिकठिकाणी फड रंगले, चर्वीचरण सुरू झालं, टवाळाची ओसरीही त्याला अपवाद नव्हती…….
……आणि मध्येच पडवीत रेंगाळत, चर्चा चोमडेपणाने ऐकणारी सुश्राव्या तिला कोणीही विचारलं नसताना टपकली……” बरं झालं ते चोली के पिछे क्या है रिवाइंड करून दाखवलं, मज्जा आली!” सुरूपने कपाळावर हात मारून घेतला, त्या टवाळाचा आणि कुटुंबाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता कारण त्यांनाही कोणीतरी शेरास सव्वाशेर भेटला होता…….
…….सगळ्या चाळीला माहित होतं सुरूपकडे केबल नाहिये ते!

anna ashtekar 94

94- अण्णा अष्टेकर, पुर्णतः काल्पनिक ® at fwa 71022131, © मकरंद बेहेरे……

…….म्हणून अण्णा लग्न करत नव्हता…….

…….तुम्हाला आत्तापर्यंत प्रश्न पडला असेल, की ‘अण्णा महादेव निवासमध्ये रुळला कसा?’ हे मी तुम्हाला अजून का सांगीतलं नाहीये……. ते आज सांगतो…….ते एका नक्षत्रामुळे…….

…….अण्णाचे वडील वारल्यावर त्याचे मोठे काका त्याच्या गावातील वाटणीची योग्य ती व्यवस्था लावून अण्णाला घेऊन मुंबईत आले, अण्णा मोठ्या काकांच्या कुटुंबाबरोबर राहू लागला……. सुरवातीला अण्णा कोणातही मिसळत नव्हता, बोलत नव्हता, आम्ही सगळी शहरातली कार्टी बाळबोध होतो, पण अण्णा आमच्याहून प्रगल्भ असल्याची चुणूक काही दिवसातच आम्हाला त्याच्या वर्तवणूकीतून जाणवली, की हे रसायन काहीतरी वेगळच आहे,…….आणि काही महिन्यांतच तो सगळ्या चाळीला आपलासा झाला…….

……मी अण्णाला गरीबांचा, दिनदुबळ्यांचा कैवारी म्हणतो ते उगाच नाही…….आम्ही सगळे हळूहळू वयात येत होतो…….

…….आमच्या चाळीत आमच्याच वयाची एक मुलगी होती अदृष्टा वैशंपायन तीच नाव, तीच नाव असं का ठेवलं हे आम्हाला लहानपणी समजतही नसे, गोरी गोरी पान दिसायला अब्जावधीत एक, त्यात भरीस भर म्हणून दोन्ही गालावर खळ्या पण ती जन्मापासून बर्याच आजारांनी ग्रस्त होती, आम्ही भीतीने तिच्याकडे फिरकतही नसू, तिचे आई वडील तिला जगवत होते, पण अण्णाची आणि तिची गटृटी जमली होती, काकांचा विरोध डावलून आणि वडिलांना मृत्यू समयी दिलेलं वचन स्मरून अण्णा तिच्याकडे जायचा, दोघे एकत्र खेळायचे अभ्यास करायचे, ती ही त्यांच्यासोबत रमायची, आणि एके दिवशी ती तिच्या आजारांमुळे मेली, अण्णा खूप खूप रडला, कशाने मैत्री, ओढ आकर्षण, की प्रेम, ज्याच्याशी तो अजून तरी अनभिज्ञ होता की……. नव्हता?

…….तिचे डोळे निळे होते आणि तीच्या डोळ्यांना अंधाराची सवय होती……. जन्मापासून कायमची…….!

Anna ashtekar 93

93- अण्णा अष्टेकर पुर्णतः काल्पनिक ® at fwa 71022131 © मकरंद बेहेरे

……. अष्टेकरांच्या अक्काच्या निधनाबाबत तुम्हाला माहिती आहेच, पण आता मोठं झाल्यावर विचार करता त्यांच्या मृत्यूबाबत तुकोबा माऊलीची ” याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा” ही ओळ सार्थ वाटते…….

…….माणूस जन्म घेतो आणि अनुभव घेत मोठा होतो, पण अध्यात्मात असं म्हणतात की, अनुभवात गुंतू नये, पण होतं नेमकं उलटं, आणि हे अष्टेकर अक्काच्याबाबत सार्थ वाटतं माझ्या आजीने त्यांच्याबाबत सांगितलेल्या किस्स्यावरून…….

…….अक्का होत्या गोंदवलेकर महाराजांच्या निस्सिम भक्त, त्यामुळे त्यांच नामस्मरण सतत चालू असायचं कामात असतानाही वैखरीने जप चालायचा, आणि मोकळ्या असायच्या तेव्हा हातात सतत माळ फिरत असायची, हे अगदी तरूणपणा पासून, बरं बाई एवढी सदाचारी की कधीही कुठल्याही प्रकारचं हूॅं नाही की चूॅं नाही, सतत सगळ्यांना मदत,  तो अडला नडला असो वा नसो, ” सम शत्रौच मित्रेच तथा मानापमानयो” या श्लोकाप्रमाणे आणि “ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान”, याप्रमाणे आयुष्य भर व्रतस्थ, शिवाय बाकीची व्रतवैकल्ये होतीच, पण…….

…….मरणाच्या काही अगोदर शुद्धीवर असताना गप्पा मारता मारता माझ्या आजीला एकदा म्हातारी म्हणून गेली, “लोकांना कसे अध्यात्मात अनुभव येतात ते देवच जाणे!”…….

‌…….म्हातारी कसलाही अनुभव न घेता वारली, पण आम्हाला पश्र्चात मर्त्य अनुभव देऊन गेली, तो म्हणजे अण्णा…….

आणि मरणाचा मुहूर्त साधला होता “अक्षय तृतीयेचा!”

anna ashtekar 90

90–  अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक) ® at fwa 71029011, © मकरंद बेहेरे……

…….परवा अण्णा डाॅक्टर दारूवालाबरोबर दुबईहून परत आला, आणि त्याला प्रत्यय आला की भारतात जन्म होण ही किती सुखाची गोष्ट आहे, आणि भारतीय राष्ट्रियत्व मिळणं, कारण आखाती देशांचे एकंदर कायदे कानुन ऐकल्यावर, तीथे काही देशांमध्ये प्रशासनाविरोधात “ब्र” काय आपल्या मर्जीप्रमाणे सुध्दा वागू शकत नाही, हे सगळं सांगायचं कारण म्हणजे, आजकाल भारतात लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा नावावर जे काही चाललयं त्याचा परिपाक…….

…….पण अण्णाने बघितलं आशिष पुरोहितला तिकडे भरपूर मानमरातब आहे, अगदी  जेव्हा जेव्हा डाॅक्टर तिथे नोकरीनिमित्त जातो तेव्हा ओळखीचे अरब तिथे त्याच्यासाठी पायघड्या टाकतात, काही ठिकाणी त्याची राजेशाही बडदास्त असते कारण आशिष पुरोहितच्या ज्योतिषाचा त्यांना आलेला चांगला अनुभव, काही नाही भविष्य सांगण्याची पध्दत तीच जी आपल्या महान ऋषी मुनींनी सांगीतलेली आहे ती जगाच्या कोणत्याही कोपर्यात लागू पडते,  त्या बरहुकुम कुंडली तयार केली की झालं मग ती कुंडली अरबाची असो नाहीतर परबाची, पण खरा खेळ खेळतात ते डाॅक्टरचे उपाय, अगदी वायल्या, जगाच्या कोणत्याही संहितेत न सापडणारे, अंतर्ज्ञानातून आलेले, अगदी अण्णाने बघीतलं की एका अरबाला अशिषने त्याच्या एका प्राॅब्लेमसाठी दर बुधवारी मशिदीत जायला सांगितलं आणि दुसर्या एकाला दर सोमवारी विड्याची पानं खायला आणि त्यांचे प्राॅब्लेम्स विना सायास सुटल्यामुळे, ते त्याला मेजवानीसाठी घरी बोलवायला आले होते, हे सगळं मला अण्णानेच सांगीतलं कारण डाॅक्टर दारूवाला स्वखर्चाने  अण्णाला एका आठवड्यासाठी दुबई फिरायला घेऊन गेला होता. पण खरी मजा पुढे आहे…….

……एका संध्याकाळी तिकडल्या एका कडूशालेत असाच माहोल बनला होता, आणि एक नवा अरब कोणाच्यातरी संदर्भाने अशिषला भेटायला आला होता, आजूबाजूला काही भारतीय वेटर होते मॅनेजर होता, काही डाॅक्टरच्या ओळखीचे इतरही भारतीय होते, अण्णा आणि अशिषसकट सगळ्यांना त्या अरबाने विचारलं तुम्ही कुठून आला आहात, जवळपास सगळ्यांनी आपापल्या राज्यांची नावं सांगीतली, फक्त अण्णा आणि डाॅक्टरच म्हणाले ” आम्ही भारतीय आहोत” आणि इतरांचे चेहरे पडले, हा किस्सा सांगून झाल्यावर अण्णा मला म्हणाला “हा सगळा परिपाक चाड नसलेल्या किंमत नसलेल्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा  आहे…….!”

Anna ashtekar 92

92-  अण्णा अष्टेकर पुर्णतः काल्पनिक, ® at fwa 70121130, © मकरंद बेहेरे…….

…….मी अण्णाबद्दल करत असलेल्या लिखाणाची कुरकुर अण्णाला लागली होती, आणि अण्णाने ते लिखाण त्यांच्या मराठी चित्रपट सृष्टीतील एका दिग्दर्शका  मित्राला ऐकवलं की ज्याच्या नावावर दिग्दर्शक म्हणून “स्वर गेले विरूनी” आणि “सारे झोपले आकाश” सारखे दोन हिट चित्रपट होते पण तरीही तो अजून बेस्ट बसने आणि भारतीय रेल्वेने बर्याच वेळा विना तिकीट प्रवास करायचा…….

…….तर अण्णाला तो स्वत: म्हणाला की मला लेखकाला भेटायचय पण अशा ठिकाणी भेटू की जिथे माहोल बनेल मूड क्रिएट होईल, आम्हाला अर्थातच कळलं, स्थळ अर्थातच “कडूशाला…….!”

…….तर ठरल्याप्रमाणे आम्ही “फिल्म सिटी रोड” वरील एका मध्यम दर्जाच्या कडूशालेत बसलो, कारण ती जागा दिग्दर्शक साहेबांच्या घरापासून जरा जवळ होती, तर बैठक बरोब्बर संध्याकाळी सात वाजता सुरू झाली, साहेबांचा आवडता ब्रॅंड अर्थातच “खंड्या” म्हणजेच डाॅक्टर मल्यांच्या काढा, आम्ही पित नव्हतो फक्त चकना खात होतो, बर्फातले पनीर, खारे शेंगदाणे, लसूण आणि बटर मध्ये तळलेले काबुली चणे, मसाला पापड, चीज गार्लिक ब्रेड इ. सुरूवात  इंडस्ट्रीतील इकडल्या तिकडल्या गप्पांनी झाली, हा काय करतो, ती काय करते, कोणाचं कोणा बरोबर चालू आहे कोण हाजी हाजी करून कशी काम मिळवतो, अनेक विषय, पण जसा काढा शरीरात मुरू लागला, तसा साहेबांच्यात भिनलेले डाॅक्टर मल्यां बोलू लागले आणि दिग्दर्शक साहेबांनी स्क्रिनप्ले, शाॅट डिव्हीजन सकट सगळा “अण्णा अष्टेकर” आम्हाला ऐकवला, कसं कधी काय करता येईल, स्केड्यूल कसं ठेवायचं, ते अगदी प्रोड्यूसर शोधण्यापर्यंत सगळं काही साहेब करणार होते कारण ते लिखाणाच्या आणि अण्णा अष्टेकर दोघांच्याही प्रेमात होते, आम्हा दोघांसमोर एक आशावादी चित्र निर्माण झालं, संध्याकाळी सात वाजता बसलेले आम्ही, बार बंद होताना रात्री दोन वाजता उठलो, तो पर्यंत साहेबांनी १४ बाटल्या रिचवल्या होत्या एकूण चकना आणि काढा मिळून काही हजारांच्या बिल झालं ते अण्णानेच दिलं,  बाहेर पडलो पानांच्या गादीवर “चार चौकोन” आणि विड्याच्या पानाची दक्षिणा साहेबांच्या हातावर ठेवली, निघताना साहेबांनी पॅंटेचे फाटके खिसे दाखवत रात्रीच्या मिटरसकट रिक्षाचं भाडं आणि हातखर्चाला काही पैसे अण्णाकडूनच घेतले आणि साहेब रिक्षाने  पसार झाले, 

……साहेब इंडस्ट्रीतील मुरलेली व्यक्ती होती की ज्यांनी स्वत:चे फाटके खिसे असूनही त्यांनी आमचं स्वप्न असलेला काही कोटीचा चित्रपट जो आम्ही मोठ्या पडद्यावर पाहू इच्छित होतो तो आम्हालाच त्यांनी आमच्या पैशांनी सात तासांत दारूच्या टेबलावर निर्माण करून दाखवला, की ज्यांच्या खिशात कडुशालेच्या बाहेर आल्यावर एक दमडीही नव्हती,

……त्यांचा हा कफल्लकपणा माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेला…….

…….आणि या काल्पनिक चित्रपटाचा सगळा त्रास अण्णाने माझ्यासाठी सहन केला……

anna ashtekar 89

89- अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa

71028022, © मकरंद बेहेरे,

……. आणि घडले विश्वा पलिकडले……

…….अण्णा माझ्यासाठी एक अनाकलनीय, गुढ बनत चालला होता, आणि त्याची प्रचिती मला नुकत्याच झालेल्या गुरूपौर्णिमेला आली…….

…… अण्णा ज्या गुरूंकडे तबला शिकायला जात होता, ते आता अण्णा बरोबर, मोबाईलवर संपर्कात असतात, त्यांची मधून मधून बोलाचाल चालू असते, अगदी कौटुंबिक जीवनापासून ते बरेच विषय निघत असतात,  गुरूंच्या एकंदर बोलण्यावरून त्यांच एकंदर सगळं व्यवस्थित असेल असं अण्णाला वाटत होतं, पण एक वर्षापूर्वी कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अण्णाला कळलं की त्यांच्या मुलाला प्रार्थमिक अवस्थेतला कर्करोग आहे, जो औषधांना, उपायांना जुमानत नव्हता, जे कधी अण्णाचे गुरू त्या अगोदर बोलले नव्हते आणि अगदी आमच्या पहिल्या भेटीतही, अण्णा त्यांना म्हणाला की त्याला माझ्याकडे घेऊन या, मला त्याला भेटायचय, तर ठरल्याप्रमाणे अण्णाचे गुरू त्यांच्या मुलाला अण्णाकडे घेऊन आले, गुरूंना वाटलं अण्णाला त्यांच्या मुलाला असंच भेटायचं असेल, पाहूणचार झाला अण्णाने त्याच्या आजाराच स्वरूप जाणून घेतलं आणि बोलता बोलता त्याचा हात हस्तांदोलनासाठी हातात घेतला आणि गुरूंचा मुलगा कळवळला आणि बेशुद्ध पडला, क्षणभर गुरूंना काही कळलच नाही आणि अण्णाने ही तसंच भासवलं आणि अण्णाचे गुरूही अचानक भंजाळल्यासारखं करायला लागले, आणि थोड्याच वेळात ते ही चक्कर येऊन जमीनीवर पडले, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर, माझ्या घरी होत होतं, आणि दोघे ही दुसर्या दिवशी आगेमागे उठले, दोघांनाही असंच वाटतं होतं की ते दोघे आत्ताच झोपेतून जागे झालेत बाकी त्यांना काही आठवतंच नव्हतं, जणू काही घडलच नाही, आणि अण्णानेही त्यांना नेमकं काय झालय त्याची टोटल लागू दिली नाही, ते जेव्हा निघाले तेव्हा अण्णा त्यांना म्हणाला उपचार सुरू ठेवा डाॅक्टरचा सतत फाॅलोअप घेत राहा, आणि मला कळवत राहा, पण अण्णा दर महिन्याला मुलाची चौकशी करायचा आणि त्यातून त्याला मुलाच्या तब्येतीची कल्पना यायची, आणि गुरूंना पण आश्चर्य वाटायला लागलं की उपायांना न जुमानणारा आजार अचानक, उपायांना साथ कशी देऊ लागला, मुलाचा माईंड सेट कसा बदलू लागला हे सगळं हळूहळू घडत होतं कारण अण्णा ते दोघेही गेल्यावर मला म्हणाला, “मी काही देव नाही, मला जमतंय तेवढं मी केलयं, बघुया काय होतंय ते”, पण गुरूंना एकंदर त्या दिवशी काय घडलं असावं हे कळलं असावं, कारणं…….

……. गुरू पौर्णिमेला अण्णाचे गुरू आले आणि धाय मोकलून रडले आणि त्यांनी अण्णाला काही कल्पना येण्या अगोदरच अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला, कारण आदल्या दिवशीच त्यांच्या मुलाचा रिपोर्ट आला होता आणि गुरूंच्या मुलाचा कर्करोग पुर्णतः बरा झाला होता, 

…….आणि अण्णा त्याच्याच गुरूंच्या कधीकाळच्या वक्तव्यानुसार आज गुरुच्या एक पाऊल पुढे होता…….