anna ashtekar 21

21

४१०२७०९२- गेले काही दिवस अण्णा माझ्याबद्दल बऱ्याच लोकांशी बोलत होता मक्या मोठा माणूस बनत चाललाय, फेमस होत चाललाय, हळू हळू ते माझ्या इथून तिथून कानावर येत होत, म्हणून परवाच्या रविवारी त्याला फोन केला सकाळी ११ वाजता, तरी त्याची सकाळ झाली नव्हती, मी फोन करून त्याचा उठी उठी गोपाळा केला होता, जागा झाला, आणि म्हणाला “मक्या तू मोठा माणूस बनत चालालायस, फेमस होत चालालायस”, म्हटलं “अण्णाशेठ गरीबाची उगाच कशाला चेष्टा करताय, कशाला हरबऱ्याच्या झाडावर चढवताय, अरे एक सीडी काढली ती खपता खपत नाही, कुणी कुठे ही आपली गाणी वाजवत नाही,कुणी आपल्याला प्रमोटही करत नाही,सगळीकडल्या लॉबिंगनी दबला गेलोय, त्यात स्वतःची पाठ स्वतःला थोपटता येत नाही,स्वतःच्या प्रसिद्धीसाठीकुणाची हाजी हाजी करता येत नाही, कशाला उगाच गरीबाला सतावताय”, “अरे मक्या मी तुला जे सांगतोय ते ऐकून तुला मुठभर तरी मांस चढेल”, मी म्हणालो “असं काय खास आहे?”

    “अरे मक्या माझ्या ऑफिसमधली माझी एक कुलीग आहे तिने सांगितलेला हा किस्सा, मला म्हणाली अष्टेकर साहेब काल एक गम्मतच झाली, मी माझ्या पडवीत काम करत होते तितक्यात माझ्या शेजारची एक कॉलेजवयीन मुलगी माझ्या घरी आली आणि म्हणाली काकु तुम्हाला गाणं ऐकायचय? मस्त आहे नव आहे, मी म्हणाले, काय ती तुमची नवी गाणी सगळी पाश्चात्य संगीत असलेली आणि चोरलेली, आमच्यासारखी जुन्या जमान्यातली ऐकण्यासारखी तरी आहेत का?, तर ती मुलगी म्हणाली काकु ऐका तर तुम्हाला खूप आवडेल, अस म्हणत तिने माझ्या कानाला हेडफोन लावला आणि मी आवाक झाले अष्टेकर साहेब तुम्ही जी गाणी आजकाल ऑफिसच्या कॉम्प्युटरवर लावता त्यातल एक गाण होत ते. मी म्हणालो, मग त्यात काय नवल? अण्णा समोरून म्हणाला अरे मक्या आजकाल मी फक्त आणि फक्त तुझी सीडी ऑफिसमध्ये लावून ऐकत असतो बस्स, मी माझ्या कुलीगला म्हणालो तिला कुठे मिळाली ही गाणी? माझी कुलीग म्हणाली तिच्या मित्राने कुठून तरी डाउनलोड केली आणि तिला दिली, मक्या हळू हळू का होईना कर्णोपकर्णी तुझी प्रसिद्धी होत चालल्ये अभिनंदन,

अण्णा फेकत नव्हता एवढ खर, पण विचार केला, बाहेरच्या खोट्या दिखाऊ जगात, माझ्या सारख्या बुडत्याला तेवढाच काठीचा आधार……. 


anna ashtekar 47

47- अण्णा अष्टेकर, (पुर्णत: काल्पनिक) ® at fwa, ६१०२९०१० © मकरंद बेहेरे,  

परवा अण्णाने मजाच केली, 

      जेव्हापासून आडव्या महादेव निवासचे उभ्या इमारतीत रुपांतर झाले तेव्हापासून आमच्या पंचक्रोशीत, शारदीय सांस्कृतिक मोहोत्सवाची सुरुवात झाली, हा मोहोत्सव गेले विस वर्ष सलग सातत्याने साजरा होतोय, हा मोहोत्सव भाद्रपदातील गणपती उत्सवापासून सुरू होतो, आणि कोजागीरी पौर्णिमेला संपतो, या मोहोत्सवासाठी सढळ हस्ते खुप मोठी वर्गणी जमत असल्यामुळे, मोहोत्सवही राजेशाही थाटात होतो, बर्याच छोट्या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रम, घडामोडी घडत असतात, वर्तमानपत्रांपासून ते दृक् श्राव्य माध्यमे मोहोत्सवाचा कानोसा घेत असतात, चौदा विद्या चौसष्ट कलांपैकी बहुतांश कलाप्रकारांना साद घातली जाते, त्यासाठी बाहेरच्या कलाकारांना त्यांची कला पेश करण्यासाठी बोलावलं जातं, स्थानिक कलागुणांना वाव दिला जातो, बरच काही घडत असतं, 
     दर वर्षी पहिल्या मोहोत्सवाचा हिशेब ठिशेब झाला आॅडीट झालं की, जानेवारीपासून पुढच्या वर्षीची आखणी सुरू होते, या वर्षाच्या मोहोत्सव समितीमध्ये अण्णा पहिल्यापासून होता, प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं, सत्कार कोणाच्या हस्ते करायचे, बक्षीसं कोणाच्या हस्ते द्यायची, या वेळी कोणत्या कलाकारांना बोलवायचं ते  खानपान व्यवस्थेचं कंत्राट कोणाला द्यायचं इ निर्णय घेतले गेले, काही सदस्यांनी सुचना ही केल्या, अण्णाही त्यातील एक होता, की राजकिय नेते मंडळींना बोलवू नका, लायकी नसलेल्या, हाजी हाजी करून मोठ्या झालेल्या व्यक्ती,  कलाकारांना बोलवू नका ई. पण सगळ्या सुचना नाकारल्या गेल्या, तरी अण्णाच्या पथ्यावर, एक गोष्ट पडली, निवेदनाच काम अण्णाला देण्यात आलं, आणि अण्णाने त्या संधीचा पुरेपुर फायदा घेतला….
अण्णा नाकासमोर चालणारा, एक घाव दोन तुकडे, आत एक बाहेर एक, त्याला जमायच नाही, या बेगडी नकली खोट्या दुनियेचा जिथे आणि जसा बुरखा फाडला जाईल तिथे फाडायचा, आणि ही संधी अण्णासाठी सहज आणि अनायसे चालून आलेली…..
     माझी रोजनिशी तो वाचायचा, त्यामुळे त्याने त्याला आवडलेले त्यातील काही निवडक शंभर लेख, त्याने आॅफिसमधील साहेबांच्या आर्थिक सहकार्याने छापले आणि नाव दिलं “व्हेवलेंथ!” 
     मोहोत्सव सुरू झाला, अण्णा आपली निवेदनाची जबाबदारी योग्य रितीने पार पाडत होता, उपरोक्त उल्लेखीत पाहुणे, कलाकार,आले की, तो त्यांना असे शेलके चिमटे, कोपरखळ्या  मारायचा, त्याचे माणुसकीला काळिमा फासणारे, त्यांना लाज आणणारे किस्से सांगायचा  त्यांना त्यांची जागा दाखवायचा आणि कार्यक्रम रंगवायचा, की त्या आसामींना धरलं तर चावतय सोडलं तर पळतयं अशी स्थिती व्हायची, नाहीतर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा, त्यामुळे एकतर ते कार्यक्रम, अर्ध्यावर सोडून निघून तरी जायचे किंवा चेहेर्यावर नकली हास्य दाखवत निर्लज्यपणे पब्लिक फिगर असल्यामुळे बसून तरी रहायचे….
    आणि तो दिवस आला कोजागिरी पौर्णिमेचा, त्या दिवशी शारदीय सांस्कृतिक मोहोत्सवाच सुप वाजणार होतं त्या दिवसाचे प्रमुख पाहुणे होते संगीतकार कौंतेय जहागीरदार आणि कवी, गीतकार मदन खोटे, माझा व्हेवलेंथ हा लेखसंग्रह या जोडगोळीच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार होता, अण्णाने त्या दिवशीही तशीच खेळी खेळली, त्याने त्या लेखसंग्रहातील “व्हेवलेंथ” हा लेख वाचून दाखवला आणि तो पाहुणे आलेल्या जोडगोळीला समर्पित केला, त्याचा परिणाम असा झाला ते ही त्यांची लायकी कळल्यामुळे कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेले, मला प्रश्न पडला की आता लेखसंग्रह प्रकाशित कसा होणार, तेवढ्यात अण्णाने ५ वर्षीय ऐका निरागस मुलाला व्यासपीठावर बोलावलं ज्याचं नाव चारुहास थळे होतं आणि त्याच्या हस्ते “व्हेवलेंथ”च प्रकाशन केलं ज्याची बोट संवादीनीवर नुकतीच फिरू लागली होती….!

anna ashtekar 25

25- ६१०२६०२२- अण्णा अष्टेकर, (पुर्णत: काल्पनिक) ® at fwa, ©मकरंद बेहेरे, १३ जून आज जवळ जवळ सगळ्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या, अण्णाचा मला फोन आला ‘अरे मी येतोय’ म्हटलं ‘ये’ तसा अण्णा आला दोन दिवसांसाठी रहायला दिवसभर अॉफिस, संध्याकाळी मोकळा असायचा, त्याला म्हणालो चल आज माझ्या गुरूंकडे जाऊ, तो एका पायावर तयार होता, दोघेही निघालो आणि विद्यालयात पोहोचलो, गुरुजी होतेच, त्यांना आम्हाला बघितल्यावर खुप आनंद झाला. आजकाल ते मला संगीतकार म्हणून संबोधतात, म्हणालो “काय गुरुजी थट्टा करताय?” त्यावर गुरुजी म्हणाले “अरे मकरंद शिष्याने गुरुच्या एक पाऊल पुढे असावं आणि ते तू करुन दाखवलस!” त्यांच्या आजच्या शिष्यांसमोर मला लाजल्यासारख झालं! त्यांनी चहा मागवला गप्पा टप्पा सुरु होत्या, आणि तेव्हढ्यात एका बाईची नवीन अँडमिशन झाली, जी प्रेगनंट होती आणि तिला डिलेव्हरीला तीन महीने होते, असं तिनेच सांगितले, त्या बाईला गुरुजींनी एका संवादीनीसमोर बसवलं आणि तिला समजेल असं सगळ्या शिष्यांना अथांग संगीत विश्वाबाबत अवगत करून देऊ लागले.मधूनच एखाद सरगम गीत किंवा एखादा अलंकार शिष्यांकडून करून घेऊ लागले, त्या बाईला ते समजलं असावं किंवा ती न समजल्याच ढोंग करत होती, पण ती बाई अति उत्साही वाटत होती, ती म्हणाली “मला या तिन महिन्यात संपूर्ण शास्त्रीय संगीत शिकायचय!” एखादवेळ तिला गर्भसंस्कार करायचे असतील, पण आम्ही तिघे एकमेकांकडे बघत बसलो आणि जरा हसलो, एवढ्या वेळ सरांनी जे समजावून सांगीतले ते तिला एका हासण्यातून समजलं असावं….त्या नंतर ती विद्यालयात कधी दिसली नाही!

anna ashtekar 06

 6- अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक),  ® at fwa ४१०२४०८०, © मकरंद बेहेरे

— अण्णा सांगत होता “आज काल सगळं व्यस्त झालयसुखाने जग मुश्कील झालय सतत काही न काही काळज्या,आज कसं जाईल उद्याच भवितव्य काय?”, अण्णा स्वतः ब्रम्हचारी होता,शिवाय मुंबई मनपात नोकरीपण तरी ही हे वाक्य त्याच्या तोंडून का बाहेर पडाव हे नवल,कारण त्याच्या सारख्या माणसाला पगार पुरून उरायला पाहिजेतो बोलू लागला “मी माझ नाही सांगत आहे रे पण आज काल माझ्या बहुतेक सहकाऱ्यांच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडत ” महिन्याला महिना लागत नाही रे” मध्यमवर्गीय माणसाची वाताहात गेल्या काही वर्षात जी झाली आहे ती सगळ्यांना दिसतेच आहे ती मी बोलायला नको,बाकी उच्च वर्गीयांना कशाची फिकारच नसते आणि अति सामान्य त्यांच्याच विश्वात जगत असतातखाव पिओ बत्ती बुझावोमधल्या मध्ये मरतो तो माध्यम वर्गलोकांना आमचा पगार दिसतो पण त्याच्या हून दुप्पट खर्च दिसत नाहीआणि आज जरी आमचा पगार दिसत असला तरी आमच्या पेक्षा आय टी वाले जास्त पगार घेतात आणि मला तेव्हा आमच्या बोलण्याची सुरुवात आठवलीभाजी ४ आणे पाव किलो,एक वडापाव ५० पैसेसायन ते मुलुंड बेस्ट बस् चे भाडे २.५० पैसेघरगुतीgasचे एक सिलेंडर ६० रुपयेअर्धा किलो चहा पावडर ४५ रुअमुलची दुधाची पाव लिटर ची पिशवी रु. ८ फक्त……. वाट बघतोय ते दिवस परत येतील…… तो पुढे बोलू लागला “लोकान्ना वाटतं सरकारी कार्यालयात काही काम नसतं पण जरा येऊन बघा १०.३० ते ५.३० करताना कसं कंबरड मोडत तेदिवसाच्या शेवटी मेंदू भंगारात द्यायची वेळ येते,लोकांना आमचे बोनस अरीअर्स दिसतात पण साधस उदाहरणएक साधा चायलेंजबाकी मी काही बोलत नाही,जरा एक दिवस ही नाही एक वेळ फक्त,कचऱ्याच्या गाडीवर एक पाटी उचलून दाखवारस्त्या शेजारच्या ड्रेनेज चेंबर मध्ये दारू न पीता उतरून दाखवा मग कळेलबोलण सोप आहे तेदुरून डोंगर साजरे आहेत,जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे……”

anna ashtekar 69

69– अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa 71025032, © मकरंद बेहेरे, 

……. आणि एकदा मीही अण्णाची फिरकी घेतली होती……

…… ही गोष्ट आहे​ २०१३ सालीची, त्यावर्षीच्या गणेशोत्सवात मी आणि अण्णाची फॅमिली आम्ही आम्हा मित्रद्वयीच्या एका काॅमन मित्राकडे गेलो होतो, त्याच्याकडे दहा दिवसांचा गणपती, वडिलोपार्जित बंगला, संपत्ती, त्याला नोकरी लग्न झालेलं एक मुलगा तो त्यावेळी दहावीला होता, आमचं कुटुंब पुण्याला अण्णाकडेच उतरल होतं, तो आमचा मित्र जन्मापासून पुण्यात वाढलेला, तो म्हणजे पुण्याचं चालतं बोलतं प्रतिक…….

…….तर त्या दिवशी आम्ही सकाळपासून त्यांच्याकडे होतो, आरती झाली आम्ही प्रसादाला चितळ्यांकडली उत्पादनं नेली होती, दुपारी मोदकावर यथेच्छ ताव मारला, थोडी वामकुक्षी घेतली, नंतर दुपारच्या चहासोबत गप्पाटप्पा झाल्या, आणि आम्ही निघालो, निघायच्या अगोदर आम्ही परत गणपतीच दर्शन​ घेतलं, पण आमच्या त्या मित्राने केलेली आरास माझ्या काही डोक्यात शिरत नव्हती, म्हणून मी आमच्या त्या मित्राला जरा कन्सेप्ट समजवून सांगायला सांगीतला, आणि त्याने आरास विषद करून सांगीतली, त्याने त्याच्या मुलांचे भवितव्य त्या डेकोरेशनमध्ये दाखवले होते की तो भविष्यात कशी प्रगती करणार आहे, त्याची सजावट ही एखाद्या सार्वजनिक मंडळाला ही लाजवेल एवढी भव्य दिव्य होती…….

…… दिवास्वप्न हा एक शाप आहे…..

…… आम्ही निघालो, वाटेत मी अण्णाला कोपरखळी मारत विचारलं “तू असे सीन्स करत नाहीस ना हल्ली?” अण्णाच्या हासण्यातून मी काय समजायचे ते समजलो……

…… जवळजवळ ४ वर्षांनी पर्वा फोनवर कुठल्यातरी विषयावरून, त्या आमच्या पुण्याच्या मित्राचा विषय निघाला आणि समजलं त्याचा मुलगा दहावीला ही आणि बारावीला एक एकदा नापास झाला होता आणि नैराश्यामुळे आणि सततच्या टोचणीमुळे त्याने गेल्यावर्षी आत्महत्या केली……

anna ashtekar 49

49– अण्णा अष्टेकर, (पुर्णत: काल्पनिक), ® at fwa, ६१०२९०७२, © मकरंद बेहेरे, अण्णा एक अवलिया आहे हे मला पुण्याई नगरकरच्या अनुभवावरुन जाणवलच होतं, पण त्याच्या साध्या बोलण्यातून ही तो गुगली टाकत असतो हे मला आज जाणवतयं.

      दिवस होता २६ जुलै २००५, मंगळवार, एका निर्मात्याने, आधीच्या प्रोजेक्टचे पेमेंट क्लिअर केले  नव्हते तरी तो परत अॅप्रोच झाला होता, या वेळेस त्याला चांगली अद्दल घडवावी, या हेतूने मी प्लॅनिंग केलं होत आणि त्याबरहुकुम मी वागत होतो. स्टुडिओ बुक केला होता तीन दिवसांसाठी, दिवस होता, २६ जुलै २००५, जस जसा काॅल टाईम निघून जात होता तसा निर्मात्याचे फोन येऊ लागले कारण स्टुडिओचं मिटर चालू झालं होतं आणि ते पैसे निर्मात्याला भरावे लागणार होते, आणि स्टुडिओ महागाचा होता, नि मी त्याला दिसत नव्हतो नि कुणी वाद्यवृंद, म्हणून कासावीस होऊन निर्मात्याचे फोन येऊ लागले आणि मी ते उचलत नव्हतो, त्यात सकाळपासून पावसाची रीप रीप चालुच होती, तेवढ्यात अण्णाचा मला फोन आला, आज तो मुंबईला आला होता पण काही बाहेरची कामं उरकायची असल्यामुळे आॅफीसमध्ये गेला नव्हता, मला म्हणाला दुपारी माटुंग्याच्या फेमस खानावळीत रमा नायक मध्ये ये, एकत्र जेऊ, ठरवल्याप्रमाणे मी गेलो, आम्ही खानावळीत दोघे रांगेत उभे होतो आणि जिथे उभे होतो तिथे जवळच्या छतावर खुप चिमण्या बागडत होत्या, आम्ही रांगेत उभे राहून ही वेगवेगळ्या विषयांवर बोलत होतो आणि विषय निघाला निसर्गाचा, अण्णा बोलता बोलता म्हणाला, ” निसर्ग ही आपल्या नकळत आपल्याला बरंच काही सांगून जातो”, आमचा नंबर आला आम्ही जेऊन घेतलं आणि निघालो, वाटेत अण्णा मला म्हणाला “मी आज काही पुण्याला जात नाही, मी तुझ्याकडेच राहणार”, मला काहीच हरकत नव्हती पण तरीही मी त्याला का म्हणून तर म्हणाला आज खुप पाऊस पडणार आहे, मी त्याला मुर्खात काढलं, दुपारचे दोन वाजले होते, आम्ही नुकतेच घरी आलो आणि नंतर पावसाने जो धुमाकुळ घातलाय तो तुम्हाला माहित्ये, 
   तीन दिवसांनी जेंव्हा पाऊस ओसरला तेव्हा अण्णा पुण्याला गेला, आणि निर्मात्याला अद्दल घडल्यामुळे निर्मात्याने नाकी नऊ येऊन माझे आधीच्या प्रोजेक्टचे पेमेंट करून टाकले, मला एवढा आनंद झाला होता की मी अण्णाला फोन केला की जेवढं जमेल तेवढं सगळ्यांना हत्तीवरून चितळे वाट, मी पैसे देतो!
     आज या गोष्टीला ११ वर्षे झाली, आज मी पेपरात एक लेख वाचला पक्षांबाबत, त्याचा गोषवारा असा होता की पक्षांनाही निसर्गात काय घडणार आहे ते अगोदर कळत असतं!

anna ashtekar 35 

35- अण्णा अष्टेकर, [पुर्णत: काल्पनिक] ® at fwa, 61027020, © मकरंद बेहेरे,- अण्णा अत्ता मे महिन्यात आला होता, तेव्हाचे अष्टमीचे अजून काही किस्से, एके दिवशी मी अष्टमीला कडेवर घेऊन बिल्डींगच्या खाली फिरत होतो, आणि एक कोंबडी तिच्या पिल्लांसोबत चरत होती, मी अष्टमीला म्हणालो “ती बघ कुकु!”, तशी ती पाच वर्षाची पोर मला विचारते, “कुकुने फॅमिली प्लॅनिंग नाही केलं? 

      या दरम्यान आमच्या एका मित्राच लग्न होतं, आम्ही त्या लग्नाला गेलो होतो, शुभमंगल सावधान झाल्यावर आम्ही त्या दोघांना स्टेजवर भेटायला गेलो, भेटून झाल्यावर खाली उतरताना अष्टमी म्हणाली आता तो काका आहे ना, तो त्या काकुचा पापा घेईल!
      अष्टमीला इडली आवडते, म्हणून माझ्या सौ ने एके दिवशी नाश्त्याला इडली केली होती, तिच्यासमोर ठेवली तर तिच्या चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा होता, ती म्हणाली शाॅश देना, मी तिच्यासमोर साॅसची बाटली ठेवली पण उघडली नाही, आणि तिला म्हणालो “मी साॅसची देईन पण एका अटीवर, मी आणि काकु तुमच्या घरी रहायला आलो तर चालेल का?” तिने काही सेकंद विचार केला आणि म्हणाली “आमच्या घरी आई फक्त पाच पोळ्या करते, दोन बाबा खातात, दोन आई खाते, एक मी खाते आणि पोळ्या संपतात!”